स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी पुण्याहून
कोथरूड मध्ये राहणाऱ्या ६ वर्षीय अरिष्का लढ्ढा या चिमुकलीने एव्हरेस्ट बेस कॅम्प वर यशस्वी चढाई केली आहे. एव्हरेस्ट वीर भगवान चावले यांच्या ट्रेकिंग ग्रुप मध्ये ती सहभागी झाली होती. इतक्या लहान वयात तिची जिद्द पाहून ती सगळ्यांसाठीच कौतुकाचा विषय ठरते आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक पूर्ण करणारी अरिष्का लढ्ढा ही सर्वात लहान वयाची पहिली भारतीय मुलगी ठरली आहे.
अरिष्का लढ्ढा हिचे वय अवघे ६ वर्षे आहे. तिच्या आधी आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियातील माया ब्रिस्टो आणि इंग्लंडमधील ऍश्लीन मॅन्ड्रिक या 2 मुलींनी हा ट्रेक केला आहे, त्या दोघींचे वय 6 वर्षे होते.
ट्रेकिंगसोबतच अरिष्का स्केटिंग आणि रनिंगही करते. ती बावधन येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहे. ट्रेकिंग मुळे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी शाळेने अतिरिक्त शिक्षणाची व्यवस्था केली आहे. अरिष्काने 9 एप्रिलला ट्रेकिंगला सुरुवात केली, 8 दिवसांचा ट्रेक केल्यानंतर आणि 65 किमी अंतर कापून 16 एप्रिलला एव्हरेस्ट बेस कॅम्पला किमान उणे 17 डिग्री सेल्सिअस आणि दिवसाचे कमाल तापमान उणे 3 डिग्री से. असताना तिने यशस्वीपणे हा ट्रेक पूर्ण केला. दिनांक 20 एप्रिलला ती पुन्हा काठमांडूला पोहोचली. पुण्यातील 8 जणांचा ग्रुप या कॅम्पमध्ये सहभागी होता.
या आधी सिंहगडावर अरिष्काने ट्रेकचा सराव केला होता. गेल्या नोव्हेंबरमध्ये 12,000 फूट उंचीवर असलेल्या तुंगानाथला गेली होती. आरिष्काची आई डिंपल लढ्ढा या मॅरेथॉन धावपटू, सायकलस्वार आणि ट्रेकर आहेत. त्यांनी 150 किमीची एन्ड्युरो शर्यतदेखील जिंकली आहे. .
डिंपल लढ्ढा म्हणाल्या की, मला आनंद आणि अभिमान आहे की मी आणि माझी 6 वर्षांची मुलगी अरिष्का हिने उणे 15 डिग्री सेल्सिअस इतक्या कमी तापमानात 11 दिवसांत 130 + 10 किमीचा एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केला आहे. या पराक्रमासह एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक पूर्ण करणारी अरिष्का लढ्ढा ही सर्वात लहान वयाची पहिली भारतीय मुलगी ठरली आहे. आम्ही दररोज दहा बारा किमी चढाई करायचो. या काळात आमचे 10 दिवसांचे दुपारचे आणि रात्रीचे जेवण शाकाहारी डाळ भात असे होते. बेस कॅम्पवर पोहोचण्यापूर्वी आरिष्काला दोन दिवस अगोदर 7 थरांचे कपडे घालायला लावले. शूजच्या आत मोज्यांचे 3 थर होते. चव आणि आरोग्यासाठी सोबत तुपाची बाटली घेऊन गेलो होतो.
Very inspirational news