अन् शालिनीला मिळालं नवं आयुष्य….
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे लांजाहून…
लांजा तालुक्यातील गोळवशी-खांबडवाडी येथील परशुराम रपशे यांची मुलगी शालिनी रपशे हिला ब्रेन ट्युमर झाला होता मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तत्परतेने केलेल्या मदतीमुळे तिचा जीव वाचला आणि तिला नवे आयुष्य मिळाले.
तिच्यावर औषधोपचार सुरू होते तसेच ब्रेन ट्युमर शस्त्रक्रिया महाग असल्याने रपशे कुटुंबीय चिंतेत होते. घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे एवढे पैसे त्वरित उभे करणे हे एक मोठे आव्हान रपशे कुटुंबीयांसमोर होते. मंत्री उदय सामंत यांनी तत्काळ मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवून शालिनीची यशस्वी शस्त्रक्रिया केली. सामंत यांच्या प्रयत्नामुळे एका मोठ्या आजारातून शालिनी हिला नवे आयुष्य मिळाले.
शालिनीचे वडील परशुराम रपशे मदत मिळवण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा त्यांनी नगराध्यक्ष मनोहर बाईत यांची भेट घेऊन कैफियत सांगितली. त्यानंतर बाईत यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला. त्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून एक लाख रुपयांचा निधी मिळाला. याबाबत शालिनीचे वडील परशुराम रपशे यांनी पालकमंत्री सामंत, नगराध्यक्ष मनोहर बाईत यांचे आभार मानले.
—————-
हार्मोनियम वादनाची नोंद गिनीज बुकात
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी पिंपरी चिंचवड मधून
पिंपरी चिंचवड येथील प्रतिभावान संगीतकार सिद्धी कापशीकर यांनी सर्वाधिक काळ सतत हार्मोनियम सादरीकरणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला. त्यांनी १० तास, २३ मिनिटे आणि २२ सेकंद सतत हार्मोनियम वाजवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे.
त्यांनी विक्रमी सादरीकरणादरम्यान, २५ वेगवेगळ्या शैलींमध्ये भारतीय शास्त्रीय संगीतातील ७५ हून अधिक राग सादर केले.
या उल्लेखनीय कामगिरीचे श्रेय त्यांनी आपल्या कुटुंबाला, गुरूंना दिले आणि भारतीय शास्त्रीय संगीताला, हार्मोनियमला आणि राष्ट्रालाही हे यश अर्पण केले.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सिद्धीचे अभिनंदन केले आणि कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला.
……..
लवकरच 100 पुस्तके ब्रेल मधून प्रकाशित होणार
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी पुण्यातून…
पुणे : दृष्टिहीनांची वाचनभूक भागवण्यासाठी एक विधायक पुढाकार घेतला जात असून आगामी काळात ब्रेल मधून 100 पुस्तके प्रकाशित करण्याचा संकल्प पुण्यातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने केला आहे.
‘चपराक’ या पुण्यातील प्रकाशन संस्थेतर्फे ब्रेलमधून 100 मराठी पुस्तके प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती ‘चपराक’चे प्रमुख घनश्याम पाटील यांनी दिली.
मराठीमध्ये सर्वसामान्यांसाठी विपुल ग्रंथसंपदा पुस्तके, उपलब्ध आहेत. मात्र, या पुस्तकांचे रूपांतर ब्रेलमध्ये करणे आणि ब्रेलमध्येच नवी साहित्यनिर्मिती करणे ही काळाची गरज असल्याचे घनश्याम पाटील यांनी सांगितले.
सध्या ब्रेलमध्ये अतिशय कमी पुस्तके उपलब्ध असल्यामुळे दृष्टिहिनांना वाचन भूक भागविता येत नाही. त्यासंबंधीचा विचार ‘अखिल भारतीय साहित्य संमेलना’च्या निमित्ताने करण्यात आला आहे.
दिल्ली येथील साहित्य संमेलनात चपराकने 31 पुस्तके प्रकाशित केली त्यात एक ब्रेल मध्ये होते आणि एक मोडीमध्ये होते.
चपराक प्रकाशनतर्फे चंद्रलेखा
बेलसरे लिखित ‘महाराजा सयाजीराव गायकवाड’ हे पुस्तक ब्रेलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
चपराककडून दोन मासिके चालवली जातात. ‘लाडोबा’ हे लहान मुलांसाठी आहे आणि ‘चपराक’ सर्व वयोगटासाठी आहे. त्यातलीच निवडक पुस्तके ब्रेलमध्ये करण्यात येणार आहेत.
याविषयी बोलताना घनश्याम पाटील म्हणाले, “मराठी पुस्तकांचे रूपांतर ब्रेलमध्ये करण्याची नितांत गरज आहे. जेणेकरून दृष्टिहीनांची वाचनभूक भागेल.अंधांसाठी साहित्य निर्मिती व्हावी हाच उद्देश यामागे असून यात बाल साहित्य, कथा आणि कादंबरी यांचा समावेश असणार आहे.”