स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे पुण्याहून
श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनतर्फे कैलासधीपती महादेवाच्या रांगोळीचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून साक्षात कैलासधाम पुण्यात अवतरले आहे. या कलात्मक प्रदर्शनाला पुणेकरांचा भरभरून प्रतिसाद लाभतो आहे.
हे प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे दिनांक ९ फेब्रुवारी पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत पाहता येणार आहे. प्रदर्शनात भोलेनाथांच्या विविध लीलांचे दर्शन रांगोळीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनचे अक्षय शहापुरकर यांनी हे प्रदर्शन भरविले आहे. गेली 15 वर्षे ते वैविध्यपूर्ण रांगोळी प्रदर्शने भरवून ही कला जोपासत आहेत आणि आपल्या कलेची देण इतरांना देत अनेक विद्यार्थीही घडवत आहेत. आजपर्यंत त्यांनी 45 पेक्षा जास्त प्रदर्शने आयोजित केलेली आहेत.
वर्षभरात जे विद्यार्थी त्यांच्याकडे रांगोळीचे प्रशिक्षण घेतात त्यांना एक चांगले व्यासपीठ मिळावे व त्यांची कला लोकांसमोर सादर व्हावी म्हणून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.
या प्रदर्शनासाठी शंभर कलाकारांनी मेहनत घेतली आहे. जवळपास 34 रांगोळ्या यामध्ये काढल्या गेलेल्या आहेत. शिवपुराणावर आधारित असलेल्या या प्रदर्शनात बारा ज्योतिर्लिंगाचेही दर्शन घडणार आहे. या प्रदर्शनाची तयारी सहा महिन्यापासून करण्यात आली आहे. इतर कुठेही बघायला न मिळणारी रांगोळी या प्रदर्शनात बघायला मिळेल. रांगोळीचे वैशिष्ट्य आणि वेगळेपण म्हणजे तुम्हाला येथे पोट्रेट रांगोळ्या बघायला मिळतील. रांगोळीत अनेक संशोधने बघायला मिळतील. भिंतीवर लावता येईल अशी पर्मनंट रांगोळीही पाहायला मिळणार आहे. पाण्याखालची पाण्यावरची आणि पाण्याच्या मधोमध देखील रांगोळी इथे पाहायला मिळेल. इथे टू इन वन रांगोळी आहे ज्यात एकीकडे बघितलं की वीरभद्र दिसतील आणि दुसरीकडून बघितलं की हनुमान दिसतील.
अनेक शाळांनी यात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. मॉर्डन हायस्कूल, आपटे प्रशाला, नवीन मराठी या शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या रांगोळीला मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी देखील या रांगोळीला भेट दिली आहे, असे या प्रदर्शनाचे संयोजक आणि प्रख्यात रंगावलीकार अक्षय शहापूरकर यांनी सांगितले.
छान