स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे दिल्लीतून
समाजात असे अनेक लोक आहेत. ज्यांना दोनवेळचे अन्न खायलाच काय पण पाहायलाही मिळत नाही. पण काहीजण असे असतात जे स्वतःचा विचार करत असतानाच समाजातील इतर लोकांसाठीही काही करण्याची इच्छा मनात ठेवून आपलं काम सुरू ठेवतात. प्रवीणकुमार गोयल हे दिल्लीतील असेच एक नाव आहे. दिल्लीमध्ये त्यांचे असे एक स्वयंपाक घर आहे जिथे भुकेल्यांना आणि गरिबांना फक्त एका रुपयात पोटभर जेवण मिळते.
नांगलोई परिसरात शिवमंदीराजवळ श्याम रसोई नावाने प्रवीणकुमार आपलं छोटंसं दुकान चालवतात. या स्वयंपाकघराची खासियत म्हणजे फक्त १ रुपयात लोकांना जेवण दिले जाते. लोकांनी फुकट समजून जेवण वाया घालवू नये यासाठी हा एक रूपया घेतला जातो.
याविषयी ५१ वर्षीय प्रवीण यांनी सांगितले की, ”रोज जवळपास १ हजार लोकांना या ठिकाणी जेवण दिले जाते. लोकांना वाटले तर लोक कधी पैसे, कधी रेशन याची मदत मला करतात. सुरूवातीला मी १० रुपयांना जेवणाची थाळी पूरवत होतो. त्यानंतर जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी, त्यांचे पोट भरण्यासाठी मी फक्त १ रुपया जेवणासाठी स्वीकारायचं ठरवलं.” सोशल मीडियावर प्रवीणकुमार यांच्या स्वयंपाकघराचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सोशल मीडियावर प्रवीण कुमार यांच्या कार्याबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे.