स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून
‘मतदानाचा हक्क बजावा… आणि पुस्तक भेट मिळवा !’असा आगळावेगळा उपक्रम बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट, नारायण पेठेतील माती गणपती, व संयुक्त प्रसाद मित्र मंडळ यांनी आयोजित केला होता. मतदानाचा टक्का वाढावा, वाचन संस्कृती रुजावी या विधायक हेतूने व मतदानाचे दायित्व सर्वांनी पार पाडावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असे साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियुष शहा यांनी सांगितले.
तसेच कसबा मतदार संघातील नागरिकांनी अधिकाधिक मतदान करावे आणि आपला मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, या उदात्त हेतूसाठी देखील या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ज्या मतदान केलेल्या मतदारांनी आपल्या बोटावरची शाई दाखवली अशा सुमारे पंधराशे मतदारांना विविध धार्मिक, प्रवास वर्णन, ग्रंथ, पाककृती, ऐतिहासिक व प्रेरणादायी पुस्तके भेट देण्यात आली. सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेमध्ये ज्या मतदारांनी मतदान केले त्यांना पुस्तक भेट देण्यात आली.
यावेळी संयुक्त प्रसाद मित्र मंडळाचे अध्यक्ष अजित परांजपे, अनिल मोहिते, माती गणपती मित्र मंडळाचे अध्यक्ष परेश हराळे, कौस्तुभ खाकुर्डीकर, साईनाथ मंडळ ट्रस्टचे प्रशांत पंडित अमित दासानी , संकेत निंबाळकर हे उपस्थित होते. उपक्रमाची संकल्पना पियुष शहा यांची होती.