स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे मध्य प्रदेशाहून
मध्य प्रदेशच्या पन्ना येथील सुरेंद्र सिंह या मजुराला खोदकाम करताना एक मौल्यवान हिरा सापडला आहे. हिराच्या खाणीत खोदकाम करताना त्याला हा हिरा सापडला आहे. या हिऱ्याची किंमत 20 लाख रुपयांपर्यंत आहे तसेच, हा हिरा 5.87 कॅरेटचा आहे. या हिऱ्याला पन्नाच्या हिरा कार्यालयात जमा करण्यात आले आहे. 4 डिसेंबर रोजी होणाऱ्या लिलावात हा हिरा ठेवण्यात येणार आहे. त्यातून जी किंमत येईल त्यातील 11.50 टक्के रॉयल्टी (स्वामित्व हक्क) कापून उर्वरित पैसे सुरेंद्र सिंह यांना दिले जाणार आहे.
याविषयी हिरे पारखी अनुपम सिंह यांनी म्हटले की, सुरेंद्रने कृष्णा कल्याणपुर पटी येथे हिरा खाण सुरु केली आहे. खाणीत खोदकाम करताना सुरेंद्र यांना 5.87 कॅरेटचा हिरा सापडला होता. येत्या 4 डिसेंबर रोजी एकुण 81 नग हिरे ठेवले जाणार आहेत. ज्याचे वजन 241.71 कॅरेट इतके आहे. याची किंमत तीन कोटी 80 लाख इतकी असू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील पन्ना गाव हे हिऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावातील ग्रामस्थांना आत्तापर्यंत अनेकदा हिरे सापडले आहेत. हिऱ्याच्या खाणी असल्याने इथे हिरे सापडत असल्याचे म्हटले जाते.