बुधवारपेठेत आगळीवेगळी भाऊबीज साजरी
स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून
पुण्यातील गणेशोत्सव मंडळे, वंचित विकास संस्था, विधायक आणि सार्वजनिक सभेच्या संयुक्त विद्यमानाने देवदासीं सोबत भाऊबीज साजरी करण्यात आली आणि बंधुत्वाचे अनोखे नाते प्रस्थापित करण्यात आले. देवदासींसमवेत भाऊबीज साजरी करण्याचे हे 27 वे वर्ष आहे.
ही आगळीवेगळी भाऊबीज सार्वजनिक काका सभागृह, बुधवार पेठ येथे साजरी करण्यात आली. यावेळी आय. एम. ए. चे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, जनता सहकारी बँकेच्या संचालिका पद्मजा कुलकर्णी उपस्थित होते. या भगिनींनी आनंद सराफ, शिरीष मोहिते, गिरीश पोटफोडे, कुणाल पवार, सुरेश कालेकर, सदाशिव कुंदन, कुमार रेणूसे, उमेश देशमुख, शेखर कोरडे या कार्यकर्त्यांना ओवाळले. या भगिनींना माहेरचा आहेर म्हणून औषधाबरोबरच बांगड्या, साडी, आणि मिठाईचा आहेर देण्यात आला. डॉ. अविनाश भोंडवे यांनी स्वच्छता आणि आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले.
दादा आम्हाला बाकी काही नको त्या एका दिवसाची वाट पाहत आमची 364 दिवसाची लढाई चालू असते अशा शब्दांत देवदासींनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. हीच आमुची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे या गाण्याची आठवण करून देत परस्परांमधील माणुसकीचे बंध जपणे किती महत्त्वाचे आहे, हे पद्मजा कुलकर्णी यांनी सांगितले.
यावेळी सभागृहाबाहेर शुभ दिपावलीची मोठी रांगोळी काढण्यात आली होती. या सगळ्या भगिनी साडीत आणि केसात गुलाबाचे फुल माळून मनाला हव्या तशा बांगड्या भरताना दिसत होत्या. माहेरी आल्याचा आनंद एक दिवस का होईना उपभोगत होत्या. दिवाळीनंतरच आपण भाऊबीज साजरी करू या त्यांच्या निरोपाचे कोडे प्रत्यक्ष त्या संवादातूनच उलगडत होत्या.