वैज्ञानिक संशोधन आता होणार अधिक वेगवान
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे दिल्लीतून
प्रगत संगणन विकास केंद्राने (सी-डॅक) विकसित केलेले भारतीय बनावटीचे ‘परम रुद्रा’ ही महासंगणन प्रणाली देशातील तीन संशोधन संस्थांना देण्यात आली आहे. या महासंगणन प्रणालीमुळे विविध प्रकारच्या वैज्ञानिक संशोधनाला गती मिळणे शक्य होणार आहे.
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘परम रुद्रा’ या महासंगणन प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले.
ही महासंगणन प्रणाली अनुक्रमे नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स (एनसीआरए) खोडद येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी), नवी दिल्लीतील इंटर युनिव्हर्सिटी ॲक्सिलरेटर सेंटर (आयुएसी), कोलकाता येथील एस. एन. बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्स या संस्थांमध्ये बसवण्यात येणार आहे. या तीनही संस्था विविध क्षेत्रात संशोधन करत असल्याने संशोधन वेगवान होण्यास चालना मिळणार आहे. नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन अंतर्गत सी-डॅकने ही महासंगणन प्रणाली विकसित केली आहे.
महासंगणन प्रणालीच्या उपयोगाबाबत नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्सचे विज्ञान प्रसार अधिकारी डॉ. जे. के. सोळंकी म्हणाले, की महासंगणन प्रणालीमुळे एफआरबीसारखे (फर्स्ट रेडिओ बर्स्ट) खगोलीय घडामोडींचा सखोल अभ्यास करणे शक्य होणार आहे. खगोलीय घडामोडींचे अधिक सखोल आणि वेगवान पद्धतीने विश्लेषण करता येणार आहे. त्यामुळे खगोलीय संशोधनाला चालना मिळण्यास मदत होईल.
हवामान संशोधनासाठी उच्च क्षमता संगणन प्रणाली
पृथ्वीविज्ञान मंत्रालयाच्या वातावरण आणि हवामान संशोधनासाठी उच्च क्षमता संगणन प्रणालींचा (एचपीसी) वापर केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रणालींचे उद्घाटन करण्यात आले. या प्रणालीसाठी ८५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या प्रणालीमुळे देशाच्या संगणन क्षमतमध्ये वाढ होऊन वातावरण आणि हवामानातील तीव्र घडामोडींचे अधिक विश्वासार्ह अंदाज वर्तवण्यासाठीचे पाऊल पुढे पडले आहे. ही उच्च क्षमता संगणन प्रणाली पुण्यातील इंडियन इस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजी (आयआयटीएम) आणि नोएडा येथील नॅॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग (एनसीएमआरडब्ल्यूएफ) येथे कार्यान्वित केली जाणार आहे. प्रणालींना अर्क आणि अरुणिका अशी नावे देण्यात आली आहेत. या आधीच्या प्रणालींना आदित्य, भास्कर, प्रत्युष आणि मिहिर अशी नावे होती. या प्रणालींमुळे पृथ्वीविज्ञान मंत्रालयाची संगणन क्षमता आधीच्या ६.८ पेटाफ्लॉप्सवरून २२ पेटाफ्लॉप्सपर्यंत वाढली आहे.