स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे श्रीनगरमधून…
आपल्या देशाचा अविभाज्य भाग असलेल्या परंतु कायम दहशतीच्या सावटाखाली असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये यंदा भयमुक्त वातावरणात मतदान होत असल्याचे पाहायला मिळाले. दहशतवाद्यांच्या भीतीला झुगारून देत नागरिकांनी लोकशाहीला महत्त्व देऊन आज पुढे येऊन मतदान केले. जम्मू-काश्मीरमध्ये आजवर झालेल्या निवडणुकांतील हे सर्वांधिक विक्रमी मतदान ठरले ही देखील नोंद घेण्यासारखी विशेष बाब म्हणायला हवी…
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 59 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. गेल्या सात लोकसभा-विधानसभा निवडणुकांतील हे सर्वाधिक मतदान असल्याची निवडणूक आयोगाने माहिती दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 58.19 टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्यातील 24 विधानसभा मतदारसंघांपैकी इंदरवालमध्ये सर्वाधिक 80.06 टक्के मतदान झाले. त्याच वेळी, पाडेर-नागसेनीमध्ये 76.80 टक्के, किश्तवारमध्ये 75.04 टक्के आणि दोडा पश्चिममध्ये 74.14 टक्के मतदान झाले.
जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यातील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सात जिल्ह्यांतील 24 मतदारसंघांमध्ये मतदान झाले. केंद्रशासित प्रदेशात 10 वर्षानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. 2019 मध्ये पूर्वीच्या राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील ही पहिली विधानसभा निवडणूक आहे.
केंद्रशासित प्रदेश म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. जेव्हा कलम 370 रद्द करण्यात आले, तेव्हा राज्य जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागले गेले. 23 लाखांहून अधिक मतदार 219 उमेदवारांना मतदान करण्यास पात्र आहेत, ज्यात 90 अपक्षांचा समावेश आहे, जम्मू विभागातील तीन जिल्ह्यांतील आठ आणि काश्मीर खोऱ्यातील चार जिल्ह्यांतील 16 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 6 वाजता मतदान संपले.
उर्वरित 66 विधानसभा जागांसाठी 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी इतर दोन टप्प्यात मतदान होणार आहे, तर मतमोजणी 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान बुधवारी सायंकाळी 6 वाजता संपले. 7 जिल्ह्यांतील 24 विधानसभा जागांसाठी मतदान झाले. विविध राज्यात राहणारे 35 हजारांहून अधिक विस्थापित काश्मिरी पंडितही मतदान करू शकणार आहेत. त्यांच्यासाठी दिल्लीत 24 विशेष बूथ बनवण्यात आले होते.
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्याअनुषंगाने बोलायचे झाले तर नॅशनल कॉन्फरन्स 11 जागांवर, पीडीपी 5, काँग्रेस 4 आणि भाजपा 3 जागांवर आघाडीवर होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 9, नॅशनल कॉन्फरन्स 6, पीडीपी 4 आणि भाजप 2 जागांवर आघाडीवर होती. 2014 मध्ये नॅशनल कॉन्फरन्स 11, पीडीपी 5, काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी तीन जागा मिळाल्या होत्या.
90 जागांवर तीन टप्प्यात मतदान
जम्मू-काश्मीरच्या 90 विधानसभा जागांवर 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. 8 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.