स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) ः
आजची प्रेरणादायी बातमी आहे स्वीडनमधून…
काहीतरी करण्याची धमक मनात असेल तर वय हा फक्त आकडाच ठरतो. शंभरी पार केलेल्या एका जिगरबाज भारतीयाने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चक्क तीन क्रीडाप्रकारांत सहभागी होऊन तीन पदके जिंकण्याची कमाल करून दाखवली आहे. या जिगरबाज युवकाचे नाव आहे वल्लभजोस्युला श्रीरामुलु आणि त्यांचे वय आहे अवघे १०१! आजवर वयाइतकीच १०० पदके त्यांच्या खात्यात जमा आहेत..
आहे ना कमाल!!
नुकतीच स्वीडनमध्ये वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत वल्लभजोस्युला श्रीरामुलु यांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. त्यांनी या स्पर्धेत ३ पदके जिंकली आहेत. ज्यात भालाफेक, थाळीफेक आणि गोळाफेक या क्रीडा प्रकारांचा समावेश होता. या स्पर्धेत ११० देशातील ८००० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
वल्लभजोस्युला श्रीरामुलु यांचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे. नुकताच १८ जुलै २०२४ रोजी वल्लभजोस्युला श्रीरामुलु यांनी आपला १०१ वा वाढदिवस साजरा केला. वल्लभजोस्युला श्रीरामुलु यांनी १९४४ मध्ये रॉयल इंडियन नेवीमधून आपलं काम सुरु केले. इंडियन नेवीमध्ये ते नेव्हीगेशन अधिकारी म्हणून कार्यरत होते. १९७६ मध्ये ते रिटायर्ड झाले, त्यानंतरही ४ वर्ष त्यांनी आपले काम सुरु ठेवले. आपल्या कारकिर्दीदरम्यान त्यांनी ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियासाठीही काम केले. त्यानंतर ते विशाखापट्टणममध्ये शिफ्ट झाले.
वल्लभजोस्युला श्रीरामुलु यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्ध केले आहे. वल्लभजोस्युला श्रीरामुलु यांनी आतापर्यंत जवळपास १०० पदके आपल्या नावावर केली आहेत. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी ४x१०० मीटर रिले स्पर्धेत चौथ्यांदा सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती.
त्यानंतर २०१६ मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियातील पर्थमध्ये झालेल्या ९०-९५ वर्षांखालील गटात ५, १० आणि २० किलो मीटर चालण्याच्या शर्यतीत ३ सुवर्णपदके पटकावली होती. त्यानंतर २०१८ मध्ये वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटीक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदकाला गवसणी घातली होती. आतापर्यंत वल्लभजोस्युला श्रीरामुलु यांनी १०० पदके जिंकली आहेत.