स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे सातपुड्याच्या पर्वतरांगांतून…
आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे ही उक्ती सार्थ करून दाखवण्याची जिद्द ज्या माणसांत असते त्यांना कोणतीही प्रतिकूलता अडवू शकत नाही. अनिल वसावे हा असाच एक जिद्दी गिर्यारोहक. स्वतःला झालेला अपघात, पत्नीचे निधन अशा अनेक आव्हानांची मालिका वाट अडवून समोर असतानादेखील त्याने एव्हरेस्टची दोन उंच शिखरे सर केली आहेत. विशेष म्हणजे आदिवासी समाजातील तो पहिलावहिला आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक ठरला आहे.
अनिल वसावे याची माउंट एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी २०२३ मध्येच निवड झाली होती. परंतु शिखरावर जाण्यासाठी अवघे ३०० मीटर अंतर उरलेले असताना खराब वातावरणामुळे अनिल वसावे याला पुढे जाता आले नाही आणि त्याचा अपघात झाला. त्यामुळे त्या मोहिमेतून त्यांना माघार घ्यावी लागली. अशातच जुलै 2024 मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले. संकटाची मालिका संपायला तयार नव्हती. दुःखाचे कढ पचवून अनिलने पुन्हा उभे राहायचे ठरवले. मनाचा निर्धार केला आणि स्वतःला सावरले. पत्नीच्या निधनानंतर अवघ्या महिनाभराच्या आत त्याने एवरेस्ट सर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून पाऊल पुढे टाकले. केवळ सहा दिवसात त्याने प्रत्येकी सहा हजार मीटर उंचीचे असलेले लेह लडाखमधील माउंट स्पंग्नगरी व कियागरी हे दोन शिखर सर करत ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे.
सातपुड्यातील छोट्याशा गावातील अनिल वसावे याने केलेल्या कामगिरीचे सगळीकडे कौतुक होते आहे. सातपुड्यातील दुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील बालाघाट हे गाव आहे. या गावाला जाण्यासाठी अद्यापही पक्का रस्ता नाही. तेथील अनिल वसावे या जिद्दी तरुणाला लहानपणापासूनच डोंगर चढणे आवडायचे. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक होण्याचे स्वप्न मनाशी बाळगले होते. त्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले. अनेक चढउतारानंतर किलीमांजारो, माउंट एव्हरेस्ट बेस कँप, माउंट कालापथर, माउंट एल्ब्रस माउंट सतोपंथ ही शिखरे देखील त्याने यशस्वीपणे सर केली आहेत. त्याने ही शिखरे सर करत आपले स्वप्न पूर्ण केले आहे.