(तन्मयी देवधर-जोशी)
स्वदेस न्युज :
आजची चांगली बातमी आहे केरळहून !
विमानाने प्रवास करावा आणि जगभर फिरावं हे सगळ्यांचेच स्वप्न असते. पण, परदेश प्रवासाचे खर्च डोळ्यापुढे आले की आपण स्वप्नांना मुरड घालतो आणि ते स्वप्न तसंच राहतं. पण चहा-काॅफी विकून गुजराण करणाऱ्या केरळमधील दांपत्याने अफलातून आर्थिक नियोजन करून आर्थिक परिस्थितीचे रडगाणे न गाता चक्क २३ देशांमध्ये जोडीने फिरण्याचा आनंद लुटला आहे. त्यामुळे परदेशगमनाचे स्वप्न पाहणाऱ्या सामान्यांसाठी ही जोडी म्हणजे एक आदर्श उदाहरणच आहे….
जिद्द…हा एकच शब्द खूप हिंमत देऊन जातो. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी तन, मन, धन आणि जिद्दीची जोड ही हवीच.. हीच जिद्द बाळगून आपली स्वप्न पूर्तता करणारे जोडपे म्हणजे केरळ मधील कोची येथे राहणारे विजयन आणि मोहना. जिद्दीच्या बळावर या जोडप्याने तब्बल २३ देशांची वारी केली आहे.
विजयन यांना लहानपणापासूनच फिरण्याची आवड होती. ही आवड अर्थात त्यांच्या वडिलांकडून त्यांच्याकडे आली. त्यांचे वडील त्यांना नेहमीच नवनवीन जागा दाखवण्यासाठी नेत असत. त्यामुळे वाढत्या वयासोबत फिरण्याची आवडसुद्धा वाढत गेली. विजयन यांच्या वडिलांच्या आकस्मिक मृत्यूमुळे घराची संपूर्ण जबाबदारी अचानक विजयन यांच्यावर आली आणि त्यांच्या फिरण्याच्या आवडीला त्यांना मुरड घालावी लागली. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते चहा आणि कॉफी विकू लागले. परंतु मनात एका कोपऱ्यात जग फिरण्याची इच्छा मात्र तशीच कायम होती. त्यांचे लग्न झाल्यानंतर त्यांना मुलगी झाली. त्यांचा चहा आणि कॉफी चा व्यवसाय सुरूच होता. त्यादरम्यानच त्यांना १९८८ साली एका यात्रेसोबत आचारी म्हणून हिमालयातील धार्मिक स्थळी जाण्याची संधी मिळाली आणि प्रवास करण्याच्या त्यांच्या इच्छेला मार्ग मिळाला.
पुढे त्यांनी आर्थिक नियोजन करून फिरण्याची आवड जोपासण्याचे ठरवले. पुढे सलग ३ वर्षे दररोज त्यांनी ३०० रुपये साठवायला सुरुवात केली. या तीन वर्षात जमलेल्या पैशातून त्यांनी प्रथम विदेशदौरा करायचा ठरवले आणि ते प्रत्यक्षातही आणले. पहिलाच दौरा ठरला इजिप्तला. त्यानंतर त्यांनी परदेश दौऱ्याचा धडाका लावला. परदेशात जाण्यासाठी कर्ज काढायचे. पुढची तीन वर्षे ते कर्ज फेडायचे आणि पुन्हा पैसे साठवून कर्ज काढून पुढच्या देशाच्या भ्रमंतीवर निघायचे. अशा पद्धतीने थोडेथोडके नव्हे २३ देश फिरण्याचा आनंद त्यांनी मनसोक्त लुटला आहे.
सुरुवातीला भारतातील वेगवेगळी ठिकाणे ते फिरत असत. परंतु मुलीच्या लग्नानंतर मात्र त्यांनी विदेश भ्रमंतीस सुरुवात केली. विजयन म्हणतात, ‘आयुष्यात त्यांना फक्त एकच इच्छा आहे ती म्हणजे जग फिरण्याची.. माझी पत्नी मोहना हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हरप्रकारे मला साथ देते.
आतापर्यंत या जोडप्याने एकत्रित मद्रास, दिल्ली,हरिद्वार,कन्याकुमारी,बंगलोर या भारतातील प्रमुख ठिकाणांसह इजिप्त, जॉर्डन, लंडन, पॅरिस, स्वित्झर्लंड, व्हेनिस, सिंगापूर, मलेशिया आदी शहरांना आणि देशांना भेटी दिल्या आहेत. भविष्यातसुद्धा त्यांच्या स्वप्नांच्या यादीत अजून बऱ्याच देशांची भ्रमंती निश्चित केलेली आहे.
मनापासून पाहिलेली स्वप्नंसुद्धा अशा चांगल्या नियोजनाने पूर्ण होऊ शकतात याचा एक उत्तम वस्तुपाठ म्हणजे हे केरळमधील जोडपं आहे.