- ‘आनंद दरबार’ दत्तनगरतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राज्यस्तरीय ‘गुरु आनंद’ पुरस्काराने गौरव
- ‘दैनिक प्रभात’चे पत्रकार हर्षद कटारिया व ‘लोकमत’चे पत्रकार संतोष गाजरे यांचाही सन्मान
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून…
समाजात निरलस वृत्तीने चांगले, विधायक काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांच्या पाठीवर आनंद दरबार, पुणेच्या वतीने कौतुकाची थाप देण्यात आली आहे. राष्ट्रसंत आचार्य भगवंत परमपूज्य आनंदऋषीजी महाराज. सा. यांच्या १२४व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्त्वांना ‘आनंद दरबार पुणे’च्या वतीने पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या प्रसंगी व्यासपीठावर केंद्रिय नागरी हवाई मंत्री खासदार मुरलीधर मोहोळ, ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे, जितोचे उपाध्यक्ष विजय भंडारी, उद्योजक अनिलकुमार कांकरिया, विजयकांत कोठारी, पोपटलाल ओस्तवाल, रमणलाल लुंकड उपस्थित होते. जैनरत्न पुरस्कार बाळासाहेब ओसवाल, युवा रत्न पुरस्कार महेंद्र सुंदेचा मुथ्था, गुरू आनंद कार्यक्षम पत्रकार दैनिक प्रभातचे पत्रकार हर्षद कटारिया व दैनिक लोकमतचे पत्रकार संतोष गाजरे यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते.
पुरस्कारांमुळे सामाजिक कामासाठी प्रेरणा मिळते आणि जबाबदारीही अधिक वाढते, असे मत मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. या वेळी बोलताना संजय आवटे म्हणाले, “बुद्ध आणि महावीर त्या काळातील खरे क्रांतिकारक होते. जैन धर्माच्या शिकवणीकडे सर्वांनी वळले पाहिजे, भारत एकमेव असा देश आहे जिथे सर्वांना आपले विचार मांडता येतात. महावीर आणि बुद्ध यांचे विचार सध्याच्या पिढीला त्यांच्या भाषेत शिकवले पाहिजेत.”
उपस्थितांचे स्वागत आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुरस्कार समितीचे प्रकाश बोरा, दिलीप संचेती, उमेदमल धोका ,परेश लोढा, प्रकाश बोरा ,पंकज बाफना, सुनील चोरडिया, सौरभ धोका, सुनील बुरड, कौशभ धोका यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश लुंकड यांनी केले.