- जगातील सर्वात युवा सीईओचा बहुमान
- कंपनीला मिळाले टाटांचे पाठबळ
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे ठाण्यातून…
मराठमोळ्या २२-२३ वर्षे वयाच्या अर्जुन देशपांडे याने ‘जेनेरिक आधार’ ही कंपनी वर्षांपूर्वी स्थापन केली असून तो जगातील सर्वात तरुण सीईओ ठरला आहे. त्याने स्थापन केलेल्या ‘जेनेरिक आधार’ या कंपनीचा टर्नओव्हर आता पोहोचला आहे तब्बल पंधराशे कोटी रुपयांच्या वर!
अर्जुन देशपांडे अवघा १६ वर्षांचा असताना मेडीकलमध्ये गेला होता. तिथे एक आजोबा कॅन्सरची औषधे घेत होते. त्यांना ती महागडी औषधे परवडत नव्हती. पण पत्नीसाठी घ्यायची असल्याने कशीबशी पैशांची जुळवाजुळव केलेली होती. हे पाहून अर्जुनच्या मनात आले की असे हजारो, लाखो लोक या देशात आहेत की ज्यांना ही महागडी औषधे परवडत नसतील. पण काहीच पर्याय नसल्याने ते इतकी महाग औषधे खरेदी करतात. त्यातूनच त्याने पर्यायाचा विचार केला आणि त्याच्या भावी उद्योगाचा पाया रचला गेला.
अगदी कोवळ्या वयात अर्जुनने ‘जेनेरिक आधार’ कंपनी स्थापन केली. गरजू आणि गरीब लोकांना अतिशय स्वस्तात औषधे उपलब्ध व्हावीत त्याचा खरा उद्देश होता. त्यासाठी त्यांने औषधे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना गाठले. तेथून स्वस्तात औषधे खरेदी करून ‘जेनेरिक आधार’ नावाची कंपनी सुरू करून त्याने मेडिकलचे दुकान सुरू केले. जी औषधे उत्पादकांकडून विकत घेऊन मोठ्या मोठ्या फार्मा कंपन्या स्वतःचे लेबल लावून अतिशय महाग विकतात तीच औषधे जेनेरिक आधार मध्ये अतिशय स्वस्त दरात मिळू लागली.
आजच्या घडीला देशभरात ‘जेनेरिक आधार’ ची तीन हजार मेडिकलची दुकाने आहेत. जिथून औषधे खरेदी करून लोकांचे हजारो लाखो रुपये वाचत आहेत. अर्जुनने या माध्यमातून आज १० हजार पेक्षा जास्त लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे रोजगार देऊ केला आहे. त्याच्या या प्रयत्नांची दखल प्रख्यात उद्योजक रतन टाटा यांनीही घेतली. रतन टाटांनी त्याला भेटायला बोलवून केवळ प्रोत्साहनच दिले नाही तर त्याच्या कंपनीमध्ये गुंतवणूकही केली.
अर्जुन सांगतो कि आपल्या देशातील अगदी दुर्गम खेड्यातही औषधे उपलब्ध व्हावीत अशी अर्जुनप्रमाणे रतन टाटांचीही इच्छा आहे. आजवर अर्जुनला अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. अर्जुनला आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली तसेच जपान सारख्या अतिप्रगत देशात मानाने बोलवले जाते. त्याचे व्याख्यान ऐकायला लोक गर्दी करतात. जपानने तर त्याला अतिशय स्वस्त दरात मोठे कर्ज दिले आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनीही अर्जुनला भेटायला बोलवून त्याची प्रशंसा केली आहे.