स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे रायगडहून
रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या रांगेत उभा असलेला लिंगाणा सुळका समुद्रापासून तीन हजार फूट उंच आहे. 3100 फूट उंचीचा लिंगाणा सुळका हा अनेक गिर्यारोहकांसाठी आव्हान ठरतो. हा सुळका सर करण्यासाठी साधारणत: गिर्यारोहकांना जवळपास 2 तासाहून जास्त वेळ लागतो. पण तानाजी केंकरे या गिर्यारोहकाने हा सुळका अवघ्या 11 मिनिटांत सर करुन नवा पराक्रम गाजवला आहे. धडकी भरवणारे लिंगाणाचा सुळके कमीत कमी वेळात पार करत तानाजीने आपलं नाव सार्थक केलं आहे.
लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे. लिंगाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथला कठीण चढाईचा सुळका. आकाशात उंच गेलेला शिवलिंगासारखा त्याचा सुळका आहे. यावर जायची वाट पूर्णतः घसरडी आहे. दोराच्या सहाय्यानेच इथं चढता येतं. या सुळक्याला सर करायला जवळ जवळ 3-4 तास लागतात. काही ठिकाणी तर सरळ कातळ चढावा लागतो.
फक्त याचे फोटो आणि व्हिडीओ पाहूनच धडकी भरते. पण हा असा धडकी भरवणारा सुळका तानाजीने फक्त 11 मिनिटांत पार केला आहे. सामान्यपणे ट्रेकिंग किंवा कोणताही किल्ला, दुर्ग, गड चढायचा म्हटलं की गिर्यारोहक एक खास प्रकारचा ड्रेस घालतात. म्हणजे आवश्यक ती सुरक्षा यंत्रणा त्यांच्याकडे असते. विशिष्ट प्रकारचे शूझ आणि दोरीची मदतही ते घेतात. पण हा तरुण अनवाणी पायाने दोरीशिवायच लिंगाणावर चढला आहे. व्हिडीओत लिंगाणाच्या पायथ्याशी हा तरुण आहे. त्यानंतर वेगाने धावत जातो आणि घसरण असलेल्या ठिकाणीहून वर चढतो. पुढे गेल्यानंतर एक सरळ उभा उंच दगड लागतो. आता हा दगड कसा चढणार, असा प्रश्न तुम्हाला पडतो. पण तुम्ही फक्त विचार करत बसता तोपर्यंत तानाजी तो उभा दगड चढून पुढे निघूनही जातो. जसजसा तो पुढे सरकतो तसतशी वाट आणखी बिकट होते. पण तरी तानाजी थांबत नाही, की समोर आलेले अडथळे आणि उंची पाहून तो डगमगत नाही. फक्त आपल्याला सुळका सर करायचा हेच लक्ष्य त्याने ठेवलेलं आहे.
वाऱ्याच्या वेगालाही आव्हान देत तो आपला वेग वाढवत सरसर लिंगाणा सर करतो.
हा व्हिडीओ पाहून काही नेटिझन्सनी त्याच्या नावातच तानाजी आहे. हे नाव त्याने सार्थ केलं अशी प्रतिक्रिया दिली आहे.
https://lokmat.news18.com/viral/raigad-lingana-fort-trekker-tanaji-kenkre-climb-in-11-minutes-3000-feet-height-lingana-shocking-video-viral-trending-mhpl-815846.html
तानाजी नावातच सर्व काही