माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचा युवकांना संदेश
राज्यस्तरिय परिवर्तन युवा परिषदेत युवकांची जिंकली मने
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) ः
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून…
नुसतेच जगताय की जगण्यामागे काही संकल्प आहे?… कारण संकल्पच जीवनाला प्रकाश देऊन जाईल. या विश्वात मला काय करायचे आहे याचा विचार प्रत्येकाने करायचा आहे. त्यामुळे आधी स्वतःला ओळखा, त्यानंतर आपल्याला काय जमते हे लक्षात घेऊन आपले क्षेत्र निवडा आणि मग त्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत व्हायचा प्रयत्न करा. असा जीवनसंदेश माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडलचे प्रमुख अविनाश धर्माधिकारी यांनी युवकांना दिला.
परिवर्तन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय परिवर्तन युवा परिषदेत अविनाश धर्माधिकारी यांनी युवकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, युवक असण्याचे मुख्य लक्षण ते हसतमुख आणि उत्साहाने भारलेले असावेत. जीवन जगण्यामागचा माझा संकल्प काय हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. जीवनाला आकार देताना त्या मागचा संकल्प काय आहे हेच महत्त्वाचे आहे. कारण जीवनाच्या कुठल्यातरी टप्प्यावर आपल्या अस्तित्त्वाचा प्रश्न पडतोच. अस्त्तित्वाचं कोंडं आपल्याला पडते. हा प्रवास कोहं पासून सोहं पर्यंतचा आहे हे समजावे लागते. त्यामुळे तुम्ही ठरवलं की जीवनाला काही अर्थ नाही तर तुम्ही ठरवलं म्हणून काही अर्थ नसेल पण एखाद्याने एखाद्या कलाकृतीसाठी जीवन समर्पित करणे हा अर्थ ठरवला तर तो त्याच्या जीवनाला एक वेगळा अर्थ मिळवून देईल. तुच ते चैतन्य आहेस ही स्वची ओळख स्वतःला व्हायला हवी. हेच आपल्या समृद्ध अध्यात्माने सांगितलेले आहे. स्वतःचा प्रकाश स्वतःच व्हा, आतून उजळून निघा असा संदेश त्यांनी दिला.
पुढच्या सहा वर्षांत मोठी उलथापालथ
या देशाची एकात्मता टिकवणे आणि जोपासणे हे देशापुढील सर्वांत मोठे आव्हान आहे. तंत्रज्ञान वेगाने बदलते आहे. पुढच्या सहा वर्षांत मानवाच्या इतिहासात झाले नाहीत इतके मुलभूत बदल होणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचे आव्हान मोठे असणार आहे. त्यात आपल्याला मागे पडून चालणार नाही. एआय ही संधी आहे आणि धोकासुद्धा. एआयमुळे आताच्या लोकांच्या तब्बल ६५ टक्के नोकऱ्या जातील. पण काही वर्षांत नवे ६५ टक्के निर्माण होती. मात्र त्याची कुशलता नव्याने प्राप्त करावी लागेल. या परिवर्तनाला सामोरे जाणे हे आव्हानच आहे. आपण त्याला सामोरे जाताना केवळ ते पेलण्याचे नाही तर त्याचे नेतृत्व कसे करू शकतो याचा विचार केला पाहिजे, असे धर्माधिकारी म्हणाले.
परिवर्तन संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय युवा परिषदेत युवकांना मार्गदर्शक ठरतील अशा विविध सत्रांचे आयोजन दिवसभर करण्यात आलेले होते. त्यात अनेक मान्यवर दिग्गजांनी येऊन मार्गदर्शन केले. ३०० हून अधिक युवक या परिषदेला राज्यभरातून उपस्थित होते. सामाजिक कार्यात युवकांची भूमिका या विषयावर आयोजित मुलाखतीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, रेस्क्यू फाउंडेशनच्या नेहा पंचमिया आणि नचिकेत उत्पात, डाॅ. मनोहर डोळे फाउंडेशनचे डाॅ. संदीप डोळे उपस्थित होते. त्यांनी सामाजिक क्षेत्रातील आपापले अनुभव आणि कार्यपद्धती या विषयी बहुमोल माहिती दिली.