- ‘पितांबरी’चे रवींद्र प्रभू देसाई यांचा युवकांशी संवाद
- उलगडले व्यावसायिक यशस्वितेचे गुपीत
स्वदेश न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे पुण्याहून….
व्यवसाय करायचा तर तुमच्याकडे कणखर, सक्षम शरीरसंपदा असली पाहिजे, तरुणांनी व्यायाम केला नाही तर ते कणखर शरीर मिळवू शकणार नाही त्यामुळे शरीर संपदा हेच युवकांचे खरे भांडवल असल्याचे मनोगत पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभू देसाई यांनी व्यक्त केले.
परिवर्तनच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय युवा परिषदेत ‘उद्योगजकता व युवक’ या विषयावरील सत्रात त्यांनी युवकांना मार्गदर्शन केले. प्रदीप लोखंडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
रवींद्र प्रभू देसाई म्हणाले, तरुण असताना आपल्याला वेळेचे महत्त्व कळत नाही. परिवर्तन घडविण्यासाठी आपण सगळा वेळ दिला पाहिजे. माझे वडील रेल्वेत, 205 स्क्वेअर फुटाच्या घरात संडास नाही, विहिरीचे पाणी असं सगळं होतं. गरीब असल्यामुळे कुटुंबात छोटे छोटे अपमान होत असत. मान मिळत नव्हता, मग मान मिळवायचा अशी भावना निर्माण झाली आणि त्या दिशेने प्रयत्न सुरू केले.
कुठल्या विषयाचा कुठे फायदा होईल हे सांगता येत नाही त्यामुळे अभ्यास करा. मला प्रयोग करण्याचा वेड होतं ते पुढे प्रॉडक्ट बनवण्यासाठी अत्यंत उपयोगी पडलं. व्यवसाय करताना जे आता उपलब्ध आहे त्याच्यासारखं बनवायचं नाही हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. लहानपणापासून पाण्याचा बंब, तांब पितळेची भांडी, कलई लावणे बघत आलो होतो त्यात ती भांडी मनासारखी स्वच्छ होत नसत. हे पाहताना विचारचक्र सुरू झालं की तांब्या पितळासाठी एखादा प्रॉडक्ट बनवलं तर.. मग ते प्रॉडक्ट बनवून मुख्याध्यापकांकडे गेलो.
मी असा प्रॉडक्ट बनवले आहे असं सांगून तो विकायचा आहे कसं विकू हे विचारलं, यावर मुख्याध्यापकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली ते म्हणाले तू घड्याळाचे काटे उलटे फिरवतोस का? स्टीलचा जमाना आहे आणि तू? तेव्हाच ठरवलं यांना घड्याळाचे काटे उलटे फिरवून दाखवायचे आणि त्यात यशस्वी झालो. उद्योजक व्हायचे असेल तर आपणच आपला प्रॉडक्ट ‘कंजूमर’ व्हायचं नेहमी लक्षात ठेवा.
ते म्हणाले, एक लक्षात ठेवा जेव्हा आपण समाजासाठी काहीही करतो तेव्हा त्याचं देणंही लागतं हे लक्षात ठेवून दर महिन्याला पितांबरीच्या बजेट मधून काही ना काही मदत करतो आहे. आतापर्यंत दहा ते पंधरा कोटी मदत केली आहे. माणसं ओळखायला शिका, व्यवहारज्ञानही आपल्याला कळलं पाहिजे. देवावर श्रद्धा ठेवा. तुमच्यामध्ये सुद्धा देव आहे त्यामुळे तुम्ही माझ्यापेक्षाही मोठे होऊ शकता.