रुपाली चाकणकर यांचा युवकांना प्रेरक सल्ला
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे आपल्या पुण्यातून…
आयुष्यात करियर करताना आर्थिक बाजू भक्कम बनवणे गरजेचे आहे. राजकारणात यायची आवड असेल तर जरुर करा. पण त्याच्या अगोदर शिक्षण आणि करियर आधी नीट करा आणि राजकारणात यशस्वी होण्यासाठी कष्टाची तयारी ठेवा, असा मोलाचा सल्ला राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी युवकांना दिला.
‘परिवर्तन’च्या वतीने आयोजित केलेल्या राजकारण आणि युवक या विषयावरील सत्रात त्यांनी युवकांना मार्गदर्शन केले. राष्ट्रसंचारचे संपादक अनिरुद्ध बडवे आणि अक्षय उद्रे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
आयुष्यात जिंकण्याची स्वप्न पाहणं कधी सोडू नका. आयुष्यात वादळं येतात तशी जातातही. पिंपळासारखं खडकावर उभं राहता आलं पाहिजे. परिस्थिती कशीही आली तरी आपण त्यातून वाट काढली पाहिजे. मनाने हारून जायचं नाही. भरभरून जगा आणि आनंदाची लयलूट करा, हा संदेश चाकणकर यांनी दिला.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, राजकारणात लोकांचे प्रश्न सोडवावे लागतात. त्याची संधी मिळतेही पण राजकारण हा सोनेरी मुकूट आहे. त्यासाठीचा प्रवास खूप मोठा असतो. त्यासाठी बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो. मी जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते मी स्पर्धा परीक्षेत जाऊ शकले नाही पण आज स्पर्धा परीक्षेच्या पेपरमध्ये माझ्यावर प्रश्न विचारला गेला आहे अशा पद्धतीचे काम आपण उभे केले आहे. राजकारणात काम करणे सोपे नाही. वाड्या वस्त्यांवर जाऊन काम करावे लागते. समाजाची मानसिकता बदलण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. महिला आयोगाचे काम करतानाही पुरुषांशी संवाद साधण्यावर भर आम्ही देतो. माणसं बदलली तरी विकृती बदललेल्या नाहीत. त्यामुळे आजही सोशलमीडियावर महिलांवर चिखलफेक होताना दिसते. त्यामुळे हे चित्र बदलण्याची गरज आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.