- माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी जिंकली तरुणाईची मने
- परिवर्तन युवा परिषदेची सांगता
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून…
आयुष्यात समग्रता यायची असेल, यशस्वी व्हायचे असेल तर आयुष्यात गुरू हवाच, असा मोलाचा संदेश माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी दिला.
परिवर्तन संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या परिवर्तन युवा परिषदेत वाचन आणि युवक या विषयावर त्यांनी सहभागी युवकांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांशी सहज संवादी अशा शैलीत त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी समारोपाच्या सत्रात संवाद साधला. ते म्हणाले, माझे स्वतःचे दहा हजार पुस्तकांचे ग्रंथालय आहे. सगळ्या पुस्तकांचे वाचन करतो. एखाद्या पुस्तकाचा प्रभाव असा असतो जो आयुष्यभर राहतो. आयुष्यात यश हवे असेल तर त्यासाठी खूप एकाग्रता आवश्यक असते. वाचनासाठी खूप एकाग्रता आवश्यक आहे. एकाग्रता न होण्याचे मुख्य कारण मोबाईलवेडाच्या अतिरेकात आहे. तरुणाईचे स्क्रीन टायमिंग ११ ते १७ तासावर गेले आहे. आपले आयुष्य उथळ आणि पोकळ असणार नाही याचा निर्धार तरुणाईने आपल्या मनाशी करायला हवा. त्यासाठी तरुणांना स्वतःकडे पाहावेच लागेल. आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचं अंतिम ध्येय आनंद हेच आहे.
लबाड्या करून मिळालेले यश टिकत नाही. तत्कालिन यश मिळाले तरी अंतिमतः ते टिकून राहत नाही. लोकांना, समाजाला जागे करू पाहणाऱ्या प्रत्येकाला वीष प्यावेच लागते आणि त्रासाला सामोरे जावेच लागते. दुसऱ्याचे जीवन समृद्ध करीत असताना आपण आतून प्रगल्भ होत जाणे हे खरे आयुष्य आहे.
अभय बंग यांनी ‘या जीवनाचं करायचं काय?’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. त्यांनी म्हटले आहे की स्पर्धा आणि उपभोग या दोनच गोष्टींकडे आजच्या पिढीचे लक्ष आहे. जगण्याच्या या शर्यतीत आपण प्रेम, जिव्हाळा विसरत चाललोय का हे पाहायला हवे. मी कोण आहे, माझा स्वभाव काय, माझ्यातील सामर्थ्य काय आहे आणि दुर्बलता काय आहेत हे पाहायला हवे. माझा स्वधर्म काय आणि युगधर्म काय आहे हे पाहायला हवे. असा जीवनाचा दृष्टिकोन त्यातून मिळतो. पुस्तक आपल्याला प्रगल्भतेकडे घेऊन जातात. आपल्या शरीराच्या वर जे डोके आहे ते भरण्यासाठी अखंड वाचन करायला हवे, असेही आवाहन देशमुख यांनी केले.