- भारतीय असलेले प्रशांत डबरी चौथ्यांदा बनले आयर्नमॅन
- १३.४३ तासांत पूर्ण केली जगातील कठीण स्पर्धा
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे थेट जर्मनीतून…
मनाशी जिद्द असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. प्रशांत डबरी या भारतीय वंशाच्या व्यक्तिमत्त्वाने वयाच्या ६२ व्या वर्षी एक अविस्मरणीय कामगिरी बजावली आहे. या वयात केलेला हा पराक्रमच म्हणायला हवा. जर्मनीतील फ्रँकफर्ट आयर्नमॅन, ही जगातील सर्वात कठीण स्पर्धांपैकी एक मानली जाते. ती त्यांनी १३.४३ तासांत यशस्वीरित्या पूर्ण केली. ही त्यांची चौथी आयर्नमॅन स्पर्धा होती.
ही स्पर्धा जगातील सगळ्यात खडतर आणि आव्हानात्मक स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेत ४ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२ किलोमीटर धावणे असे आव्हान पेलावे लागते. प्रशांत डबरी यांनी ते आव्हान पेलले आणि आयर्नमॅन बनले.
प्रशांत डबरी यांनी दक्षिण आफ्रिकेतील प्रतिष्ठेच्या अशा दोन कॉम्रेड्स रन पूर्ण केल्या आहेत, त्यापैकी एक यंदा पूर्ण झाली. यंदाच्या वर्षात दक्षिण आफ्रिकेतील Comrades अल्ट्रामॅरेथॉन व जर्मनी येथील आयर्नमॅन करणारे प्रशांत डबरी हे भारतातील एकमेव स्पर्धक ठरले आहेत.
प्रशांत डबरी यांचे हे यश विशेष कौतुकास्पद आहे कारण त्यांनी वयाच्या ६२ व्या वर्षीही अशा कठीण आणि आव्हानात्मक स्पर्धेत भाग घेऊन ती पूर्ण केली आहे. आपल्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा सर्वोच्च कस लावून त्यांनी हे यश खेचून आणले आहे. त्यांच्या या अविरत धडपडीने आणि कठोर परिश्रमाने भारतातील क्रीडा जगतात एक नवी स्फूर्ती आलेली आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशाचे सर्वत्र कौतुक होते आहे.
या कामगिरीसाठी अनेक महिने सराव केला. त्यातून आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढविली. आयर्नमॅन ही स्पर्धा संपूर्ण जगभरात प्रतिष्ठेची मानली जाते आणि प्रशांत यांनी ती यशस्वीरित्या पूर्ण केल्याने भारताचे नाव त्यांनी जागतिक पातळीवर उज्वल केले आहे.