- दिग्गज चित्रकारांच्या चित्रांनी सजलेले एक आगळेवेगळे चित्रप्रदर्शन
- प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर, वासुदेव कामत, चंद्रमोहन कुलकर्णी, डग्लस जाॅन, अन्वर हुसेन, सचिन जलतारे, हर्षवर्धन देवताळे, सिद्धार्थ शिंगाडे, शुभा गोखले यांच्या चित्रांचा समावेश
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून…
घर, फर्निचर आणि चित्र यांचा समावेश करून साकारलेले एक सुंदर चित्रप्रदर्शन सध्या पुणेकरांचे लक्ष वेधून घेते आहे. नेहमी भरणाऱ्या चित्रप्रदर्शनांपेक्षा वेगळी आणि कलात्मक मांडणी केलेली असल्याने हे प्रदर्शन पाहण्यासाठी खूप गर्दी होते आहे. हे प्रदर्शन घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कलादालनात १८ आॅगस्ट पर्यंत सुरू असणार आहे.
क्युरेटर प्रियंवदा पवार आणि सुहास एकबोटे यांच्या प्रयत्नांतून ही चित्रनगरी साकारलेली असून त्याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा असाच आहे. सुहास एकबोटे हे एस्थेटिक फर्निचरचे जाणकार म्हणून ओळखले जातात. आपल्या घरामध्ये असणारी फर्निचरची रचना आणि त्याला अनुरूप असणारी व घराचे सौंदर्य वाढवणारी चित्रे ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून हे चित्रप्रदर्शन साकारण्यात आलेले आहे. चित्रे आणि फर्निचर यांची मांडणी इतकी सुरेख जमलेली आहे की त्यातून एका वेगळ्याच चित्रनगरीत आपण फिरतो आहोत असा अनुभव मिळतो.
वासुदेव कामत यांच्या उत्कृष्ट चित्रांचा एक खास कोपरा साकारण्यात आलेला आहे तिथे पाय खिळल्याशिवाय राहत नाहीत. डग्लस जाॅन यांची लखलखीत रंगातील चित्रे नजरेत भरतात. कलात्मकता आणि चित्रशैलींची विविधता या दोन्हीचा मनोज्ञ संगम या चित्रप्रदर्शनात पाहायला मिळतो आहे. त्यामुळे या प्रदर्शनाचा अनुभव आवर्जून घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे. ही चित्रे विक्रीसाठीसुद्धा उपलब्ध आहेत.
कला आपल्याला समृद्ध करतात, आपल्या जाणीवा विकसित करतात आपल्यातील कलात्मक दृष्टी विकसित करतात, आपल्याला रसिक बनवतात, चोखंदळ बनवतात, जीवनाचा आनंद घ्यायला शिकवतात. हे प्रदर्शन पाहताना आपल्याला हाच अनुभव येतो.